विशाल बोरकर
View Point News
नागभीड :
तालुक्यातील विविध ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. महिन्यापेक्षा जास्त काळ लोटल्यानंतरही शहरातील रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे तसेच पडून असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छतेचे तीन-तेरा वाजल्याने नागरिकांनी तीव्र संताप वाटसरू प्रवाशातून व्यक्त केला आहे.
नागभीड तालक्यातील विविध गावांतील ग्रामपंचायतींचे आपल्या हद्दीतील भागात स्वच्छतेच्या तुलनेत अधिकाधिक दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. नागभीड चंद्रपूर रोडला देखील गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला पाहायला मिळत आहे या भागात दैनंदिन कचरा संकलनासाठी दररोज घंटागाडी विविध भागात कचरा गाडी येऊन देखील रहिवाशी रात्रीच्यावेळी किंवा दिवसा रस्त्याच्या कडेला, चौकातील कानाकोपऱ्यात घरगुती दुकानातील कचरा टाकतात. याठिकाणी टाकलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाण देखील वाढले आहे. .
नागभीड तालुक्यातील कचरा समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे ठिकठिकाणी कचरा साचून राहत आहे. त्याची वेळेत उचल न झाल्याने लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कचऱ्याची उचल वेळेत करुन शहर स्वच्छ ठेवावे अशी मागणी केली जात आहे. त्याठिकाणी कचऱ्याचे ढिग साचून राहत आहेत. शहरात बऱ्याच ठिकाणी ओला व सुका कचरा एकत्र करुन टाकला जात आहे. तसेच अशा ठिकाणी मोकाट कुत्री व जनावरांचा वावर वाढत आहे. कचऱ्यात प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर असल्याने ते वाऱ्याने सर्वत्र विखुरले जात आहे. अशा ठिकाणाहून प्रवास करताना लोकांना नाकाला रुमाल लावूनच ये-जा करावी लागत आहे. या प्रकारामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या प्रकारामुळे डेंग्यूचे रुग्ण वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने कचऱ्याची उचल नियमितपणे करुन संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी होत आहे.
नागभीड तालुक्याच्या कार्यक्षेत्रात सिंगल युज प्लास्टिक पिशवीचा वापर करण्यास बंदी असताना सुद्धा शासकीय आदेशाचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्याचा वापर बेकरी, दुकानदार व हातगाडी, फेरीवाले विक्रेत्यासह अन्य ठिकाणी होत आहे. वापर झालेल्या पिशव्या मोठ्या प्रमाणात कचराकुंडीत फेकून दिल्या जात आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला पिशव्यांचा खच पडलेला दिसत आहे. या गंभीर प्रकारामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून राज्य शासनाने या बाबतीत चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने शोध मोहीम राबवून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
