Vishal Borkar (Journalist)
दै.अधिकारनामा & View Point News
महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती ‘कृषी दिन’ (शेतकरी दिन) म्हणून साजरी केला जातो. नाईक यांनी शेती आणि ग्रामीण विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ दरवर्षी १ जुलै रोजी राज्यात कृषी दिन साजरा केला जातो. नाईक यांनी १९६३ ते १९७५ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले, ज्यामुळे ते राज्याच्या इतिहासात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिले. याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो. तसेच ‘शेती आणि माती’वर निस्सीम भक्ती असणारे जागतिक ख्यातीचे कृषीतज्ञ व प्रगतशील शेतकरी महानायक वसंतराव नाईक यांना आदरांजली अर्पण केल्या जाते.
कृषी दिनाच्या निमित्ताने १ जुलै ते ७ जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी सप्ताह साजरा केला जातो. या कृषी दिनाच्या निमित्ताने कृषीविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल, याकडे वसंतराव नाईक यांनी लक्ष दिले होते. वसंतराव नाईक यांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली. वसंतराव नाईक हे हाडाचे शेतकरी होते.’शेती आणि शेतकरी’ हे त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. तसेच त्यांनी राज्यात ‘कृषी विद्यापीठा’ची स्थापना केली. शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली. १९७२ च्या दुष्काळाचे संकट त्यांनी आव्हान म्हणून स्विकारले आणि दुष्काळनिवारणाचा शाश्वत मार्ग दाखवला. राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो.
शिवाय भारताचे राष्ट्रपती , भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी यांनी “वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहे.” या शब्दात नाईकांचे गौरव केले आहे. तसेच ‘थेट शेतकऱ्यांच्या बांधावर’ मोहिमेचे प्रवर्तक, विचारवंत एकनाथराव पवार यांनी ‘आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत’ या शब्दात महानायक वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे. तसेच वसंतराव नाईक यांचे शेतकऱ्यांवर भरपूर प्रेम होते. वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत कधी ‘शेतकरी आत्महत्या’ हा शब्द देखील गवसला नव्हता
