Vishal Borkar (Journalist)
View Point News
नागभीड:-
गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांनी रखडलेला नागपूर ते नागभीड रेल्वेमार्ग पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातून जात असलेल्या या रेल्वेमार्गाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने मान्यता दिल्याने नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा रेल्वेमार्ग पुढील 6 महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. नागपूर (इतवारी) ते नागभीड या 106.2 किलोमीटर नॅरोगेज रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात येत आहे. नागपूर ते उमरेडपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु, उमरेड ते नागभीड या दरम्यानचे काम ठप्प आहे. यापैकी 16 किलोमीटरचा रेल्वेमार्ग उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातून जात आहे. त्यामुळे या रेल्वेमार्गाच्या मान्यतेसाठी प्रारंभी राज्य वन्यजीव मंडळ आणि भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून यांच्या कसोटीतून जावे लागले. त्यानंतर राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने पाच महिन्यांपासून निर्णय घेतला नाही.या मार्गावरील तीन ठिकाणे अतिशय संवेदनशील आहेत. तेथे वन्यप्राण्यांच्या भ्रमणासाठी सात भुयारी मार्ग (अंडरपास) उभारण्याची सूचना करण्यात आली आहे. त्या भुयारी मार्गाची सरासरी लांबी 188 मीटर ते 770 मीटर एवढी ठेवावी लागणार आहे. तसेच विद्यमान 22 रेल्वे क्रॉसिंग आणि पूल उभारावे लागणार आहे. वन्यप्राण्यांच्या भ्रमणासाठी त्यांच्या आकार 2.653 मीटर ते 5 मीटर असावे, असे बंधन आहे.भारतीय रेल्वे आणि राज्य सरकारच्या सहभागातून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (महारेल) हे काम करीत आहे. या रेल्वेमार्गाचे डिसेंबर 2019 पासून काम सुरू झाले. 20 महिन्यांत ब्रॉडगेजचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. परंतु, कोरोनामुळे आणि वन्यजीव मंडळाच्या मंजुरीविना प्रकल्पाचे काम अडकले होते. याबाबत महारेलच्या अधिकाऱ्यांनी नागपूर (इतवारी)-उमरेड 50 किलोमीटरचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होईल असे सांगितले. उर्वरित उमरेड ते नागभीड 56 किलोमीटरचे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मान्यता मिळाली आहे. पुढील सहा महिन्यांत हे काम पूर्ण केले जाईल, असे महारेलचे समूह महाव्यवस्थापक डी. आर. टेंभुर्णे यांनी सांगितले.
