Vishal Borkar (Journalist)
View Point News
कोट्यवधी भारतवासीयांच्या मनाला हळहळ व्यक्त करून जाणारी बातमी समोर आली आहे. भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं आज २६ डिसेंबर रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनात त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे.
मनमोहन सिंह यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पंजाबच्या गाह (सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब) येथे झाला होता. ते देशाचे १४ वे पंतप्रधान होते. मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ सारख्या नामांकीत विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं आहे. त्यांनी १९५७ ते १९६५ या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं आहे.
मनमोहन सिंह १९६९-७१ या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक होते. त्यानंतर १९७६ मध्ये ते दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विशेष म्हणजे १९८२ ते १०८५ या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. तर १९८५-८७ या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. तसेच १९९० ते १९९१ या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते. यानंतर 1991 मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते.
