Vishal Borkar (Journalist)
View Point News
धाग्याचा व्यापार करून भारतीयांनी पतंगबाजीला एका अलिखित खेळाचं स्वरूप दिलं आणि त्यातून दुसऱ्याचा पतंग काटण्यासाठी तयार करण्यात आला मांजा. हाच मांजा प्रत्येक ठिकाणी इतका जीवघेणा ठरतोय की मनुष्यवधासारखे गंभीर गुन्हे देखील त्यामुळे व्हायला लागलेत. हैदराबादचा कागद, उत्तर प्रदेशची काच आणि बरेलीचा मांजा असला की पुढच्या पतंग कटलाच म्हणून समजा. मांजा डोर चरखी लोटाई फिरकी पतंगाचा धागा अशा नावाने ओळखला जाणारा हा कापूस मांजा अनेक वर्षांपासून आत्तापर्यंत संक्रांतीच्या सणाला लोकांना आनंद देत होता. पण आज बरेलीचा ओरिजनल मांजा मागे पडून चायनीज मांजा आलाय आणि सगळं काही बिनसलं. आता हा चायनीज मांजा आहे तरी काय? चायनीज मांजा नावाचा हा प्रकार चायनीज मोनोकिट नावाच्या कंपनीने बेंगलोर मध्ये सुरू केला. आता प्लास्टिक मांजा अधिकाधिक लोकप्रिय करण्यासाठी लोकांनी त्याला चायनीज मांजा असं नाव दिलं. मुळात चीनमधून कोणताही मांजा येत नाही. म्हणजेच काय तर भारतातच प्लास्टिक नायलॉन पासून बनवलेल्या मांज्यालाच चायनीज मांजा म्हटलं जातं. म्हणजेच चिनी मांज्यांसाठी सुतापासून तयार केलेला दोरा वापरला जात नाही. प्लास्टिक व नायलॉनच्या दोऱ्यापासून हा मांजा तयार होतो. त्यासाठी विशिष्ट प्रकारचा घोळ तयार करून त्यात काचेचे बारीक तुकडे टाकले जातात. धातू व लोखंडाचा भुगा टाकून ॲल्युमिनियम ऑक्साईड व झिरकोनियम ऑक्साईडचा वापरही त्यात असतो. त्यामुळे साहजिकच हा मांजा धारदार शस्त्राप्रमाणे होतो. यामुळे पतंग उडणाऱ्या स्पर्धेत दुसऱ्या प्रतिस्पर्धेची पतंग सहज कापली जातात. पण या मांजामुळे पतंगापेक्षा माणसांचे गळे जास्त कापलेत असं दिसतंय. म्हणजे अनेक ठिकाणी एकाचा हात, मान तर डोळ्याच्या बाजूचा भाग कापला गेलाय असे असंख्य उदाहरण आपल्याला देशभरात पाहायला मिळतील. आल्या दिवशी अनेक ठिकाणी लोक गंभीर जखमी झाले इतकंच नाही तर काहींचा जीवही गेलाय. त्या अनुषंगाने मांजा संदर्भात अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल झालेत. मग असं असूनही हा मांजा बाजारात मिळतो तरी कसा?
