Vishal Borkar (Journalist)
View Point News
लखुजीराजे जाधव यांची ही वीरकन्या,शहाजीराजे भोसले यांची आदर्श पत्नी, छत्रपती शिवाजी महाराज यांची सर्वगुणसंपन्न आई,छत्रपती संभाजी महाराज यांची प्रेरणास्रोत आजी व स्वराज्याच्या राजमाता अशा महान व्यक्तिमत्वाच्या धनी म्हणजे राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ भोसले होत.ज्या काळात मराठी मातीत सर्वत्र मुर्दाड आणि सत्वविरहीत वातावरण निर्माण झालं होतं.मोगल,आदिलशाही,निजामशाही व कुतूबशाही यांच्याकडे चाकर म्हणून काम करण्यातच स्वकीय सरदारांना धन्यता वाटत होती.न्याय,स्वातंत्र्य,समता,बंधूता व मानवता या मूल्यांचा विचार कोणाच्याही मनात व मेंदूत नव्हता.जातीभेद,स्त्रीअत्याचार,दैववाद व कर्मकांडातच जीवन – मरणाचे चक्र सतत सुरू होते .
या परिस्थितीत सामान्य रयतेचे,सुखाचे,स्वाभिमानाचे,स्त्रीसन्मानाचे व शेतकऱ्यांचे स्वराज्य निर्माण करणे ही गोष्ट अशक्य होती.स्वराज्य निर्माण करणे सोपे काम नव्हते. मात्र या काळोखाच्या काळात स्वराज्य निर्माण करावे यासाठी शहाजीराजे भोसले व माँसाहेब जिजाऊ यांनी सर्वप्रथम प्रयत्न केले.स्वतःच्या सुखी संसाराचा त्याग करून रयतेचा संसार सुखाचा व्हावा, स्वराज्य निर्मिती व्हावी याकरिता शहाजीराजे व जिजाऊ एकमेकांपासून दुर राहीले .स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले व राजमाता जिजाऊ यांनी स्थानिक सरदारांना एकत्रित आणले. त्यांच्यात स्वाभिमान जागा केला. स्वराज्य संकल्पना समजावून सांगितली.जिजाऊंनी स्वतःच्या पित्याचा व भावांच्या निर्घृण हत्येचा घाव सहन केला होता. त्यामुळे स्थानिक मातब्बरांनी एकत्र येऊन स्वराज्य निर्मिती करावी यासाठी जिजाऊ आग्रही होत्या.
राजमाता जिजाऊंनी स्वराज्यनिर्मितीचे स्वप्न फक्त पाहीले नसून शिवरायांच्या पाठीशी खंबीर उभं राहून स्वराज्य प्रत्यक्षात आणलं. शिवरायांच्या जन्मानंतर सुरुवातीची दहा बारा वर्ष शिवनेरी, सिंदखेडराजा,पुणे,बंगलोर अशी धावपळ असतांना जिजाऊंनी पुणे व आसपासच्या परिसराचा भौगोलिक, सामाजिक व राजकीय परिस्थितीचे आकलन करून स्वराज्य स्थापनेच्या दिशेने आखणी केली. शिवरायांचे संगोपन व शिक्षण याबाबतही जिजाऊ सतर्क होत्या.उत्तम शिक्षणाबरोबर उच्च संस्कार ही जिजाऊंनी शिवबावर केले .भाषाज्ञान, युद्ध कला ,घोडदौड ,पोहणे, तलवारबाजी, राजनीती ,न्यायदान, समाज विज्ञान, साहित्य अशा अनेक क्षेत्रात तरबेज होण्यासाठी शहाजीराजे व जिजाऊंनी शिवबासाठी शिक्षक नेमले.
युद्धकला, भाषाज्ञान, राजनीती व न्यायदानाचे प्रत्यक्ष धडे जिजाऊ शिवबांना देत.शिवबांना स्वराज्यासाठी आदर्श राजा तयार करणे व सर्वसामान्य रयत सुखी होणे हेच जिजाऊंचे ध्येय होते. त्याचदिशेने त्यांनी शिवरायांना घडविले.माँसाहेब जिजाऊ यांनी प्रचंड आत्मविश्वासाने पुणे व परिसरातील सरदार,सावकार देशमुख ,पाटील ,शेतकरी,श्रमकरी, कारागीर अशा सर्व स्तरातील स्त्री पुरुषांच्या भेटी घेतल्या.त्यांच्यात आत्मभान जागे केले.स्वराज्य निर्मिती शक्य आहे हा विश्वास दिला. स्त्रीयांनी पुरूषांच्यामागे ठाम उभे राहावे ,त्यांना लढण्यास प्रोत्साहन दयावे.व प्रसंगी स्वतः रणचंडिका होऊन दृष्टांचा संहार करावा यासाठी बळ दिले.
पुणे येथे आदिलशहाचा ब्राम्हण सरदार मुरार जगदेव याने बारा फुटी पहार रोवून ठेवली होती. त्यावर फाटका झाडू, तुटकी चप्पल, फाटके वस्त्र, जळक्या वस्तू टांगून ठेवून दहशत निर्माण केली होती. जो कुणी इथे वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल, अशी दवंडी फिरवली होती. त्यामुळे आजचे पुणे तेव्हा ओसाड झाले होते.ही शापित भूमी जिजाऊंनी बालशिवबाकडून सोन्याच्या नांगराने नांगरून घेतली.तिथे लाल महाल बांधला.हा धार्मिक व सांस्कृतिक दहशतवाद जिजाऊंनी उपटून काढला . जिजाऊ शिवबासह लाल महालात राहू लागल्या.त्यांच्या आधाराने गावक-यांनी वस्ती केली. जिजाऊंनी आंबवडी व पुनवडीचे धरण बांधले.शेतक-यांना शेतीसाठी बी- बियाणे, कर्ज, सवलती दिल्या.वीर बाजी पासलकरांनी शहराचे नाव जिजापूर ठेवले.हे जिजापूर म्हणजेच आजचे पुणे .
शहाजीराजे यांच्या मृत्यूचा मोठा आघात जिजाऊंनी सहन केला.धार्मिक बंधनापेक्षा कर्तव्यपालन व स्वराज्य उभारणी महत्वाची आहे हे लक्षात घेऊन त्या सती गेल्या नाही. शहाजीराजेंचे स्वतंत्र राज्य निर्मितीचे स्वप्न जिजाऊंनी आपल्या मुलाच्या हातून पूर्ण केले. शिवाजीराजांना स्थानिक मातब्बर मराठा सरदारांचा उपद्रव होऊ नये व स्वराज्य उभारणीमध्ये त्यांचे सहकार्य मिळावे या हेतूने जिजाऊंनी शिवरायांचे आठ विवाह करून दिले .लष्करीदृष्टया अत्यंत महत्वाच्या आठ घराण्यांशी शिवरायांचे संबंध प्रस्थापित केले. तसेच जिजाऊंनी शिवरायांचे दोन पुत्र व सहा मुलींचे विवाह स्वराज्यनिष्ठ घराण्यात लावून दिले .
स्वराज्यात महिलांना सन्मान होता.स्त्रीअत्याचाराबाबत कठोर शिक्षा दिल्या जात. याबाबत शिवरायांना जिजाऊ मार्गदर्शन करीत.गुन्हा करणारा कितीही मोठया पदावर असो वा नातेवाईक असो त्याचा गुन्हा पाहून शिक्षा दिली जायची.शेतकरी, कष्टकरी यांना सुखाचा घास मिळत होता. शिवरायांच्या प्रजाहितदक्ष कारभारामुळे सामान्य रयत आनंदी होती. प्रत्येकाच्या मनात हे राज्य आपलं आहे व आपल्यासाठीच आहे ही भावना निर्माण करण्यात जिजाऊ- शिवराय यशस्वी झाले.जिजाऊंना शस्त्रास्त्र चालविणे व घोडेस्वारी करणे कला अवगत होत्या.शिवाजी महाराजांच्या आग्राभेटी दरम्यान सहा महिन्यांच्या अनुपस्थितीत जिजाऊंनी स्वतः सर्व राज्यसूत्रे हाती घेऊन उत्तम प्रशासन केले व या दरम्यान रांगणा नावाचा किल्ला जिंकला. शाहिस्तेखान स्वारीच्या वेळी शिवाजीराजे पुण्यापासून दूर होते तरी जिजाऊंनी धैर्याने या संकटाला तोंड दिले.जिजाऊ अत्यंत तेजस्वी, बुद्धिमान, राजनिती निपुण ,युद्धशास्त्राच्या जाणत्या व उत्तम संघटक होत्या.
जिजाऊंना मराठी ,अरबी, कन्नड, उर्दू, संस्कृत व फारशी या सहा भाषा अवगत होत्या.राजमाता जिजाऊ या विज्ञानवादी होत्या.अंधश्रद्धा व कर्मकांड यावर त्यांचा विश्वास नव्हता.शिवरायांनी अनेक गड व किल्ले अमावस्येच्या रात्री जिंकले. त्यातील एकाही किल्ल्यावर सत्यनारायण, पुजाविधी केला नाही.जिजाऊंनी सर्व जातीधर्माच्या स्त्री -पुरुषांना सलोख्याने व समानतेने वागविले. त्यामुळे हिंदू- मुस्लिम समाजातील लोक आनंदाने एकत्र राहून स्वराज्यासाठी मरायला तयार होते.
शिवाजीराजे व अफजलखान भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी घडवून आणण्याची कल्पकता जिजाऊंचीच होती .भेटीची तयारी जिजाऊंच्याच मार्गदर्शनाने सुरु होती. अफजलखान भेटीच्या अगोदर शिवरायांनी माँसाहेब जिजाऊंचे दर्शन घेतले. त्यावेळेस जिजाऊ बोलल्या, ‘ शिवबा- माझ्या लेकरा, माझा विश्वास आहे. तुझ्या हातून खान मारल्याच जाईन व तू पूर्ण विजयाचा मालक होशील … पण लक्षात ठेव माझ्या बाळा . समजा, खानाच्या हातून तू मारल्या गेलास तर सहकारी मावळ्यांना कठोरपणे पूर्वसूचना देऊन सांग की खान मारल्याच गेला पाहीजे . खानाचे शिर येण्याची मी प्रतापगडावर वाट पाहीन . नेताजी व सा-या सैन्याने त्यांची जबाबदारी तू मेला तरी पार पाडायचीच. तुझ्या पाठीमागे बाळ शंभूला मी राजा बनवून त्यांची प्रधान मुखत्यार बनून स्वराज्याचे काम चालू ठेवून पूर्ण करेन.’ सारे जण जिजाऊंचे बोल ऐकून अवाक् झाले पण त्यांच्या चेह-यावर तेज होते. स्वराज्य निर्मितीसाठी स्वतःच्या प्रिय पुत्राला साक्षात मृत्यू समोर पाठविण्याचे धैर्य जिजाऊंनी केले .जे धाडस करण्यासाठी काळजावर दगड ठेवावा लागतो . आपण करत असलेल्या कार्यासोबत प्रामाणिक निष्ठा असावी लागते .
राजमाता जिजाऊ यांचे माहेर व सासर दोन्ही राजकीय दृष्ट्या प्रभावी होते.त्याच वातावरणात जिजाऊ घडल्या . जिजाऊंनी सत्य, न्याय, बंधूता,समता, स्वातंत्र्य,विज्ञानवाद,न्याय व मानवता या मानवी मूल्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी राजकारणात केली.रयतेच्या सुखासाठी, स्त्री सन्मानासाठी, शेतकरी व श्रमकरीच्या हक्कासाठी, स्वराज्य निर्मितीसाठी, मानवी अस्मिता जागृतीसाठी राजकीय व सामाजिक वातावरण निर्मिती केली . राजमाता जिजाऊ या भूतकाळाचा अभ्यास करून वर्तमानात योग्य निर्णय घेऊन भविष्याचा अचूक वेध घेणा-या महान राजकीय मुत्सद्दी व्यक्तीमत्व होत्या.आज याच पद्धतीने निष्ठापुर्वक राजकीय वातावरण निर्मिती झाल्यास संपूर्ण भारत देशात स्वराज्य निर्माण होईल.
१२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त तमाम भारतवासियांना, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक व प्रचार- प्रसार क्षेत्रात कार्य करणा-या व्यक्तीमत्वांना जिजाऊ चरित्रातून कार्य करण्यास प्रेरणा मिळो आणि स्वार्थी, गुंड, कपटी, जनतेची फसवणूक करणा-या, दंगली भडकवून स्वतः सुरक्षित राहणा-या राजकारणाला मूळापासून उपटून फेकण्याची हिंमत कार्यकर्त्यांना, मतदारांना मिळो तसेच सर्व तरुण-तरुणींना आदर्श राजकारण करण्याचे बळ माँसाहेब जिजाऊ देवो ही मनपुर्वक सदिच्छा.
जय जिजाऊ जय शिवराय !!!
